३०० किलो वजनाचे दगड आपोआप सरकू शकतात का?

जिथे अगदी ३०० किलो वजनाचे दगड पण सुकलेल्या जमिनीवर आपणहून सरकतात आणि मागे लांबलचक माग सोडतात (कधी कधी तर चक्क अर्ध्या किलोमीटरहुन जास्त अंतराचा!).

अगदी अलीकडील काळापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञाना ह्या जागेचे कोडे उलगडत नव्हते. काही वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि थोड्याश्या नशिबाच्या साथीमुळे सरतेशेवटी शास्त्रज्ञ त्यात यशस्वी झाले.

अमेरिकेतील डेथ व्हॅलीमधील हवामान खूप शुष्क असते. ह्या भागामध्ये खूपच कमी पाऊस पडतो त्यामुळे येथील जमीन पण कोरडी असते. तसेच इथे प्रतिकूल हवामानामुळे सजीवांची संख्या पण खूप कमी आहे. 

अश्या ह्या वाळवंटी भागामध्ये एक सुकलेले तळे आहे जे जेमतेम ४ किमी लांब आणि २ किमी रुंद भागामध्ये पसरलेले आहे. जगातील इतर तळी ही सामान्यतः उंचसखल असतात पण हे तळे पूर्णतः वेगळे म्हणजे सपाट / समतल आहे. तसेच पावसाचा अभाव असल्यामुळे हे तळे वर्षाचे बहुतेक दिवस सुकलेले असते.

ह्या जागेवर एक नैसर्गिक आश्चर्य अनुभवायला मिळते. अगदी लहान आकाराच्या दगडांपासून ते २००-३०० किलो वजनाचे दगड इथे सुकलेल्या वाळूमध्ये आपोआप सरकतात आणि मागे एक सरळ किंवा नागमोडी माग सोडतात.

सुरुवातीला लोकांचे असे मत झाले की एखादा माणूस किंवा प्राणी दगडांना वाळूमध्ये ढकलत असावा. पण दगडांचा माग सोडून इथे माणसाचे किंवा कोणत्याही प्राण्याच्या पायाचे ठसे कधीच आढळून आले नाहीत. त्यामुळे ही शक्यता नाकारण्यात आली आणि शास्त्रीय संशोधन सूरू करण्यात आले.

रेसट्रॅक प्लेया भागातील अनेक दगडांवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस (स्थाननिश्चिती करण्याची उपकरणे) लावण्यात आली. तसेच सभोवतालच्या भागामध्ये काही स्वयंचलित कॅमेरा बसवण्यात आले.

एवढा सगळा खटाटोप करून कित्येक दिवस शास्त्रज्ञांच्या हाती विशेष असे काहीच लागत नव्हते. ह्या जागेचे कोडे उलगडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना अचानक त्यांचे नशीब पालटले.

एकाएकी पाऊस सुरू झाला. त्यामुळे गेले कित्येक दिवस पाण्याअभावी कोरडे पडलेल्या ह्या भागामध्ये पाणी जमा झाले. रात्रीच्या वेळी येथील तापमान गोठणबिंदूच्या जवळपास पोचते. त्यामुळे तळ्यातील पाण्यावर बर्फाचा थर जमा होऊ लागला. हा बर्फाचा थर जास्त जाड किंवा जास्त बारीक नव्हता.

गेले कित्येक दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती घडायला सुरुवात झाली. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ ह्या काळामध्ये अनेक दिवशी दगड सरकत असतानाचे व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करण्यात आले तसेच दगडांवर बसविलेल्या जीपीएस उपकरणांच्या साहाय्याने ते किती अंतर पार करून गेले ते पण नोंदविण्यात आले. 

पुढे फेब्रुवारी २०१४ मध्ये तळे पूर्णपणे सुकले तेव्हा अपेक्षेप्रमाणे दगडांचे माग दिसू लागले. त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की,

जेव्हा जेव्हा रेसट्रॅक प्लेया भागामध्ये पाऊस पडतो आणि तळ्यामध्ये पाणी जमा होते तेव्हा एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की दगड सरकू लागतात. पाण्यामध्ये अर्धवट बुडालेल्या दगडांवर बर्फाचे आवरण जमा होते आणि जेव्हा

मोठ्याने वारा वाहू लागतो तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर जमा झालेले बर्फाचे थर सरकु लागतात. 

त्याच्या बरोबर हे मोठमोठाले दगड पण सरकु लागतात. नंतर जेव्हा तळे आटते तेव्हा दगडांचे माग दिसू लागतात. इथे बर्फ महत्वाची भूमिका निभावतो.

अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी एका नैसर्गिक आश्चर्याचा उलगडा केला.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*