समोर अनेक रेल्वेरूळ दिसत असताना रेल्वेच्या मोटरमनला त्याच्या मार्गाचे आकलन कसे होते?

एखाद्या मोठ्या रेल्वेस्थानका कडे कूच करत असताना समोर दिसणारे बहुसंख्य रूळ पाहून रेल्वेचालक गोंधळून जाण्याची नक्कीच शक्यता असते.

परंतु तसे होत नाही, कारण मुळात कुठल्या रुळावरून चालायचे हे रेल्वेचालाकाच्या हातात नसते.

रेल्वेचालकांना रेल्वे रुळांचे आकलन करण्याची गरज नसते, रेल्वे अपोआप त्याच रुळांवरून धावते ज्या रुळांची जोडणी रेल्वेला दिलेली असते.

आणि कुठल्या रुळाची जोडणी द्यायची हे संपूर्णतः रेल्वेच्या स्थानक व ब्लॉक सेक्शन नियंत्रकांच्या हातात असते.

रेल्वेचे स्थानक नियंत्रक रेल्वेची एका रुळांवरून इतर रुळांवर होणारी वळणे नियंत्रित करतात.

मुख्यतः, ज्या स्थानकांवर दोनपेक्षा अधिक रुळांची उपलब्धता असते अशाच स्थानकांवर ह्या प्रकारचे नियंत्रण केले जाते. रेल्वेचालक केवळ रेल्वेचा वेग नियंत्रित करू शकतात.

रेल्वेचालकांना ते चालवत असलेल्या विभागांची खडानखडा माहिती असते. त्यामुळे कुठल्या रुळांवरून रेल्वे कशी नियंत्रित करायची ह्याचा त्यांना व्यवस्थित अनुभव असतो. त्याकरिता रेल्वेचालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.

ज्या स्थानकांच्या बाहेर, अनेक रुळांचे जाळे पसरलेले असते, त्या स्थानकापासून काही अंतरावर एक विशेष सिग्नल बसवलेले असते. ह्या सिग्नलला “होम सिग्नल” म्हणतात.

ह्याला सिग्नलला दिव्यांसोबतच काही पंख जोडलेले असतात. पंख्यांच्या दिशेवरून आणि त्यामध्ये चालू होणाऱ्या दिव्यांवरून रेल्वेचालकाला ह्या गोष्टीचा इशारा केला जातो, कि तिथून पुढे ती रेल्वे कुठल्या रुळावर (अथवा फलाटावर) नेली जात आहे आणि त्यानुसार चालकाने किती वेगाने रेल्वे घेऊन जायची आहे.

काही आधुनिक सिग्नल यंत्रणेत फलाट क्रमांक देखील लिहून दाखवला जातो. ह्याद्वारे रेल्वेचालकाला केवळ रुळांची कल्पना दिली जाते, मात्र कुठल्या रुळावर जायचे ह्यावर चालकाचे नियंत्रण नसते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*