मधमाशा मध का बनवतात?
मधमाश्यांच्या पोळ्याची लोकसंख्या हि एका छोट्या खेडेगावाएवढी असते. एका पोळ्यात ६० ते ७० हजार मधमाश्या असतात.
यातल्या कामगार मधमाश्यांचे काम असते ते म्हणजे त्यांच्या पोळ्यापासून ३-४ किमी. च्या परिसरात असणाऱ्या फुलातून मकरंद काढून आणणे.
मधमाशी जेव्हा एका फुलातून मकरंद काढून आणते, तो मध नसतो. मकरंद म्हणजे फुलांनी मधमाशा, भुंगे आणि फुलपाखरे याना दिलेली लाच असते. मकरंद घेताना या सर्व “लाचखाऊ” लोकांच्या पायाला, शरीराला, फुलांचे पुंकेसर अथवा स्त्रीकेसर चिकटतात आणि त्यातूनच फुलांच्या परागीभवनाला मदत मिळते.
जेव्हा हा मकरंद मधमाशीच्या तोंडात असतो, तेव्हा तिच्या तोंडातून एक विशिष्ट प्रकारचे वितंचक (Enzyme) स्रवते, जे या मकरंदासोबत मिसळते.
या वितंचकाचे काम असते मकरंदाला जास्तीतजास्त शुद्ध करणे. म्हणजे जेव्हा मध पूर्ण तयार होतो तेव्हा त्यात अगदी थोडे पाणी आणि खूप जास्त साखर उरते. शुद्ध मधाचे गुणोत्तर हे १७% पाणी व ८३% साखर असते. (येथे साखर
म्हणजे आपण घरात वापरतो ती साखर ना घेता, glucose, fructose आणि maltose असा घ्यावा. या सर्वाना एकत्र मिळून मी येथे साखर हा शब्द वापरला आहे.)
मधमाशी जेव्हा मकरंद आणते तेव्हा ती मधमाशी पोळ्यात येऊन दुसऱ्या मधमाशीला तो देते, ती मधमाशी अजून एक तिसऱ्याच मधमाशीला तो देते..असे हे चक्र साधारण ८-१० मधमाश्या झाल्यावर थांबते. प्रत्येक मधमाशी या मकरंदामध्ये आपल्या तोंडातील वितंचक मिसळत असते. त्यामुळे मध लवकर तयार होतो.
जेव्हा हा मध साठवला जातो तेव्हा पोळ्यात असणाऱ्या मधमाश्या सारखे आपले छोटे पंख हलवून या मधला वारा घालत असतात, जेणेकरून त्यातील पाणी उडून जावे आणि साखरेचे प्रमाण जास्त असावे!
परंतु, सगळ्याच मकरंदाचा मधच होतो असे नाहीये. यातून थोडा भाग हा पोळ्यासाठी लागणारे मेण तयार करण्यासाठी वापरला जातो. मेणसुद्धा मधमाश्यांच्या शरीरात असणाऱ्या एका छोट्या घटकातून स्त्रवत असतो, जो या मकरंदाच्या संपर्कात आला कि मऊ होतो.
आता हे सर्व उपद्व्याप करण्याचे कारण म्हणजे हिवाळ्यात आणि ऐन उन्हाळ्यात फुलांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे साधारण ६-७ महिने या मधमाश्या अहोरात्र कष्ट करतात आणि नंतर ५-६ महिने मध खात आरामात दिवस काढतात.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*